Total Pageviews

पालक म्हणुन नवोदय समज़ुन घेताना

माझ्या आयुष्यात असे खुप कमी क्षण आहेत जेव्हा माझ्यामुळे पप्पांना खुश होताना पाहीलय , पप्पा खुप मध्यमवर्गीय सरळमार्गी त्यामुळे त्यांच्या अपेक्षा ठरलेल्या , शून्यातून विश्व निर्माण करताना त्यांना आलेल्या अडचणी त्यांच्या मुलांना येवु नये इतक साध सोप गणित . त्यात त्यांच काहीच चुक नाही . आपल्या मुलाने पहिल्या पाचात याव , मन लावुन अभ्यास करावा , खुप चांगल्या मार्काने पास व्हाव इतक्या माफक सर्वसामान्य अपेक्षा . त्यातल्या त्यात माझ्या दोन बहिणींपैकी एक बहिण खुपच जास्त हार्ड वर्किंग आणि अभ्यासू साहजिकच तुलना व्हायची आणि मग माझा ओरडा फिक्स. मला माझ्या पोटापुरते मार्क्स मिळायचे पण ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसायचे . इंजिनियरींग करताना नेहमी डिस्टींकन मिळावे ही अपेक्षा पण ते सुद्धा मिळाले नाही कधी . कॅंपस मधे निवड व्हावी तर ते पण नाही . आयुष्यातील अश्या अनेक टप्यावर मी पप्पांचा भ्रमनिरास करत आलोय . आज पार्थ कडे पाहतांना त्या अपेक्षा पुर्ण केल्या नसल्याची सल तितकीच बोचते पण काही घटनांमुळे त्यांना दिलेला आनंद आठवला की थोडी का होईना त्या जखमेवर फुंकर मारली जाते . अगदी बोटांवर मोजता येतील इतक्यात घटना किंवा मलातरी फक्त दोनच आठवताहेत त्यातील एक म्हणजे जेव्हा माझ नवोदय ला सिलेक्शन झालेल आणि दुसरी म्हणजे जेव्हा आम्ही सगळी फॅमिली सिंगापुर ला येत होतो

तरीदेखील माझ्या निवडीच आलेल्या पत्राची बातमीचा आनंद आजही मला जास्त आठवतो

त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो आणि पप्पांना बघुन थोडा उडालो कारण पप्पा आॅफिस वरुन घरी यायच्या आत मी खेळून आलो पाहीजे असा काहीसा नियम नाहीतर मार ठरलेला. मी नवोदय च्या क्लास साठी राशिवडे ला जायचो तर तिथे माझ्यासोबत क्लास ला असणार्यापैकी सागर आणि महादेव ला सिलेक्शन लेटर्स आलेली म्हणुन पप्पा माझ्या नावच काही लेटर आलय का पाहायला घरी लवकर आलेले . आई ला विचारल तर आई नाही म्हणाली आणि तिथेच पप्पांचा मुड गेला. खुप खोलवर त्यांना ते लागल्याच आता कळतय , माझ तर होत की झाल काय आणि नाही काय ? आई खुश होती कारण इतक्या लहान वयात एकुलत्या एक मुलाला बाहेर शिकायला पाठवायच तिच्या जिवावर आलेल. त्यामुळे आई थोडीफार खुश . नवोदय म्हणजे एवढ काय भारी आहे अस समजण्याच ते माझ वय नव्हत मला फक्त घरच्यांपासुन अभ्यासासाठीचा ससोमिरा चुकतोय ना किंवा मनसोक्त राहायला मिळतंय ना ह्यातुनच बाहेर जायच होत .पण ते काय झाल नाही

दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो परत आलो खेळून आलो तर पप्पा आलेले त्यांना कोणीतरी सांगितलेले की माझ्या नावाच पत्र आलय ते ऐकुन काम लवकर संपवुन घरी आलेले पण काय कल्पना नव्हतीच . खेळून घरी आलो तर पप्पा जबरदस्त खुश आणि आई च्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत . पप्पांनी एकदम जवळ घेतल , मिठी मारली , आयुष्यातली आत्तापर्यंतची तेवढीच काय ती एक मिठी किंवा कौतुक केलेल आठवतय . २० रुपये काढुन दिले आणि म्हणाले जा तुझी आवडती खारी घेवुन ये . परित्याला खारी आणि बटर खुप मस्त मिळायच . मुलांच्या शिक्षणातुन उरलेल्या जमाखर्चामधे महिन्याच्या शेवटी तेवढच काय ते सेलेब्रेशन शक्य होत बहुतेक

नवोदय ला सिलेक्ट झालो म्हणुन खुप दिवस पेंडीग होती ती पॅरागाॅन ची डबल थराची स्लिपर घेवुन दिली . तेव्हा पॅरागाॅन च्या दोन प्रकारच्या स्लिपर यायच्या एक पांढरी निळ्या पट्ट्यांची आणि दुसरी डबल थराची खाकी. दोन्हीमधे बहुतेक १० रुपयांचा फरक होता .           भोगावती नदी ला जरा पाऊस पडला की तेव्हा पुर यायचा , जॅकवेल भरायच आणि नळाला पाणी बंद . शनिवार होता की सुट्टी होती म्हणुन अंजली मावशी ( आमच्याकडे धुण करायच्या ) त्यांच्यासोबत धुण घेवुन नदिला गेलो. पाणी बघितल की पोहायला उड्या मारणारा मी पुरांमुळं कोणी आत सोडेना पाय धुवायला गेलो तर कशी काय वाहुन गेली . नंतर कितीतरी दिवस पाणी कमी झाल्यावर कितीतरी किलोमीटर नदीकाठान चालत गेलेलो ती चप्पल सापडते काय पाहायला . परत काय तशी चप्पल घ्यायला जमल नाही , परवा सिंगापुरमध्ये १५० डाॅलर म्हणजे ७५०० चे शुज घेतले तेव्हासुद्धा ती चप्पल आठवल्याशिवाय राहीली नाही . बक्षिस काय सारखी सारखी सारखी मिळत नाहीत किंवा नवोदय प्रवेशा बरोबरीच भारी कायतरी मिळवायच बाकी आहे अजुन .

नवोदय ने मला तरी जपलच पण पालकांना पण जपलं किती काय कशासाठी मार खाल्ला असेल त्याची मोजदाद नाही पण शिक्षा देवुन झाली की त्या वेळची ती खोडी एकतर शिक्षक विसरायचे किंवा त्या पुढची खोडी मी पुर्वीपेक्षा जास्त भयानक करायचो पण पालक दिवस येवुपर्यंत सगळ शांत झालेल असायच .

मी वी ला असताना पप्पांची बिहार ला ट्रान्सफर झाली , माझा उमेदीचा काळ आणि नेमके पप्पा बाहेर . बहुतेक नवोदय च्या जिवावर पप्पांनी बिनधास्त ट्रान्सफर घेतली असावी कारण बहिणींच्या बाबतीत त्यांना काळजी नसायची . माझा उमेदीचा काळ म्हणजे जेव्हा माझ्या खोड्या एका वेगळ्या उंचीवर पोचलेल्या , किती मार खाल्ला असेल सगळ्या सरांचा त्याला मोजदादच नाही . पण आई एकटी इथे आहे , तीला काही टेंशन नको म्हणुन आईला पालक भेटीवेळी कोणत्याही शिक्षकांनी भेटायला बोलावल नाही , मला विचारायचे पप्पा कधी येणार आहेत आले की भेटायला सांग . पप्पा सहा महिन्यांनी कधी आले की त्यांना मग खोड्या कमी आणि अभ्यासाविषयी सांगायचे , अभ्यास काय ठीकठाक होता म्हणजे सहा महिण्यांनी पप्पा आल्यावर सुद्धा त्यांना जास्त टेंशन नको . एका विद्यार्थ्याच्या पालकांची काळजी फक्त नवोदय मधेच घेतली जावु शकेल , दुसरीकडे कुठे पाहील नाही


भाची ला सांगली च्या नवोदय मधे ॲडमिशन मिळाल सुरुवातीला तीला खुप जड जायच , आम्ही  ११ वी ला गेल्यावर त्याला कारण म्हणजे तुमचा एक ग्रुप जमला की तुम्हाला मग बाकी कशाची काय गरज लागत नाही तेच सुत्र तिला सांगितल की मित्र मैत्रीणी जमव मग नवोदय सुखकर वाटत . आमच्या बॅच मधे तसे सगळेच मध्यमवर्गीय आणि कोणाचेही पालक उगाच कोणत्या शिक्षकांच्या मागे मागे करायचे नाहीत किंवा विनाकारण जावुन भेटणे वैगेरे नसायचे त्याचा एक फायदा झाला की आम्ही सगळे एका लेव्हल वर राहीलो , काही आवडते विद्यार्थी होते पण त्यांना इतर मुलांमधे कमी भाव होता त्यामुळे आपसुक आम्हा टगेखोरांचा माज जास्त होता . आज शाळेविषयी जेव्हा विषय निघतो तेव्हा त्याकाळचे टगेखोर जास्त भावनिक होताना दिसतात कारण नवोदय

मुळे एक दिशा मिळाली . आमच्या ज्युनियर बॅच मधे काही पालक शिक्षकांच्या मागे पुढे करायचे आज ती मुले चेष्टेचा विषय असतात . शिक्षकांनी पालकांना काही सांगु नये अस पण वाटायच कारण आमचे पालक म्हणनार आणि जरा बडवा .


नवोदय ची पोर म्हणजे मांजराची पिल्ल वाटतात कुठुनही कसेही टाका स्वत:च्या पायावर उभे राहणार


आज एक पालक होताना म्हणजे भाचा , भाचीच्या बाबतीत किंवा आता पार्थ च्या बाबतीत शाळा निवडताना जाने आपसुक आपली शाळा कसली भारी अस वाटत राहत . नवोदय ची किंमत नवोदय सोडल्यावर कळतेच पण त्याहुन जास्त पालक झाल्यावर कळते

कारण आमच्या पालक जसं सरांना सांगायचे की आमची मुल तुमच्या ताब्यात दिलेत त्याला कस काय वळन लावायच किंवा कसा अभ्यास करायला लावायचा तुमच तुम्ही ठरवा अस सांगाव्या वाटणार्या शाळा कमी उरलेत . मग सरांनी मारल काय झोडल काय किंवा लाड केले काय तर ते त्याच्या भल्यासाठी केल हा विश्वास असायचा आजही मला तो विश्वास फक्त नवोदय बदद्ल वाटतो

नवोदय मधे असताना किंवा काॅलेज मधे गेल्यावर मी थोडासा फॅमिली पासुन लांब होतो किंवा अस म्हणुया एकट राहायची सवय लागली होती पण तो नात्यांचा ओलावा तसाच टिकुन होता . कालपरवा एक कलिग जो सैनिक स्कुल चा आहे तो सुद्धा म्हणाला की साला हम लोग कहींपर भी कितने दिन भी अकेले रह सकते है . पण तरीदेखील कुठेतरी बॅकग्राउंड मधे घरच्यांचा विचार असतोच असतो

आज कोणतेही निर्णय घेताना किंवा काहीही करताना एका वेगळ्या आत्मविश्वासाने मी पुढ जातो तो शाळेमुळे आलाय हे नक्की , असा आत्मविश्वास देणारी शाळा माझ्या मुलांना मिळेल का ?

कोणतीही लहान मोठी घटना असु दे किंवा काहीही शुल्लक नवोदय च्या मित्रांपासुन लपुन रहात नाही , उदाहरण घ्यायच झाल तर पार्थ pre mature रात्री ला जन्माला आला थोडा सिरीयस होता . डाॅ राहुल ला फोन केला मी मुंबईवरून तिथे पोचेपर्यंत पहाटे पर्यंत तो पण जागा , डाॅक्टर कसे आहेत काय काय ट्रीटमेंट घ्यावी लागेल चौकशी सहीत तयार , कुठे काय अडल आणि सच्या , सुर्या , तुषर्या , आमल्या ला किंवा माझ्या बॅच च्या कोणालाही फोन केला तर सगळ सोडुन यायची तयारी असणारे किंवा कुठे काय चुकल तर कानाखाली जाळ काढायला पुढे मागे पाहणारे मैत्र त्याच्या आयुष्यात त्याला मिळेल काय

आयुष्यातील काहीतरी चुक करताना पालकांना तोंड कसे दाखवायचे हा विचार सगळ्यांच्याच मनात येत असेल पण आम्हाला आमच्या शिक्षकांना कसे दाखवायच हा देखील विचार मनात येतो तसे आदरार्थी शिक्षक त्याला मिळतील का ?

अशी काळजी वाटत राहते . नवोदयमधुन शिकलेल्या मुलांच्या पाल्यांना पुन्हा नवोदय मधे प्रवेश नाकारायला हवा कारण एक पिढी सक्षम केल्यावर पुन्हा त्याच घरातील मुले सक्षम करण्यापेक्षा खर्या वंचितांना चान्स मिळायला हवाय पण तरी वाटत राहत पार्थ सा नवोदयला ॲडमिशन मिळाtयला हवय 


मग कुठेतरी माझ्या पप्पांना माझ्या नवोदय ॲडमिशन बदद्ल तेवढा आनंद का झालेला हे कळत ..


२५-३० हजारांच्या घड्याळामधला वर्तमान पाहतांना  किंवा - हजार चे शुज वापरताना .... 


२० रुपयांच्या खारी चा तो आनंद किंवा पॅरागाॅन च्या डबल लेअर चपलेचा तो भुतकाळचा उत्सव जास्त आठवतो , पुन्हा जगावासा वाटतो .