Total Pageviews

पोहणे आणि मी

लहानपणा पासून पोहण्याची जाम आवड , मुरगुड ला बोरगावे काकांच्या विहीरी मधे पोहायला शिकलो मग नंतर नदी मधे धुमाकूळ , पप्पांच्या बदलीमुळे पारिते ला आलो तिथे तर आमच्या शेजारी भुइंगड़े फॅमिली स्विमिंग चैंपियन होती . महाराष्ट्राच्या स्विमिंग टीम मधे निम्म्यापेक्षा जास्त मंडळी ही तेव्हा भोगावती परिसरातील असायची . बरगे आणि भुइंगड़े ही दोन आडनावे फेमस होती , त्यांच्या सोबत मजबूत शिकलो. पोहण्याचे सगळे प्रकार मला आता सुद्धा व्यवस्थित येतात . काठावरुण उड्या मारण्याचे तर अनगिनत प्रकार येत होते , सूर , ऐदान , मांडी घालून उडी हे सगळे प्रकार तर चिल्लर...
नंतर मी नवोदय ला गेलो आणि पोहणे थोड़े मागे पडले . 
जेव्हा जेव्हा मग सुट्टी असायची तेव्हा पोहणे फिक्स , सुट्टीत शक्यतो मी आजोळी जायचो एकतर बदल्यांमुळे नविन मित्र गोळा करायला लागायचे आणि वरुन एका शाळेत नसल्यामुळे थोड़ जड़ जायच ,म्हणून आजोळी बेस्ट. तिथे मित्र मंडळी फिक्स होती पण तिथे जवळ विहीर किंवा नदी नव्हती ..
7 वि किंवा 8वीत असेन कदाचित, फक्त पोहायच म्हणून आजोळी गेलो नव्हतो आणि वाळव्या मधे राहिलेलो , शेजारी 3-4 जणांची आमची गैंग जमलेली .आम्ही विहिरीमधे volleyball खेळायचो म्हणजे बॉल एकमेकांकडे पास करायचा आणि ज्याच्यावर डाव त्याने तो काढून घ्यायचा प्रयत्न करायचा , नदीच् पात्र खुप विस्तीर्ण आहे पण विहिरीत खेळायला बर पड़त, दमलो की भिंत असते धरायला . सकाळी जो सर्वात पाहिला पोचेल त्याला डाव माफ़ मग सगळ्यात आधी येण्यासाठी झुंबड़ उडायची त्या दिवशी मी सगळ्यात आधी पोचलो , विहिरीत बघतो तर आमच्या गल्ली मधली वैजू काकू पाण्यात पाठीवर पडलेली मला सुरुवातीला वाटल बैकस्ट्रोक मारत असेल पण नंतर कळल की काहीच हालचाल करत नाही आणि चेहऱ्यावर माशा बसलेत , मी नुस्ता वैजू काकू , वैजू काकु म्हणून जोरजोरात रडायला लागलो , मला काहीच कळत नव्हतं काय करायच , माझ ते भोकाड ऐकून एक माणूस पळत आला आणि म्हणाला काय रे काय झाल? मी विहिरीकड़ बोट दाखवल . मला म्हणाला तू श्रीखंडे साहेबांचा ( पप्पा बैंक मधे असल्यामुळे शक्यतो सर्वांना माहीत असायचे ) पोरगा ना ? घरी जा मग आणि काय बोलू नको कुणाला . मी तसाच घरी आलो घरी येवुपर्यंत मला फक्त लाल साडी नेसलेली ,पांढरी पडलेली आणि कपाळावरच  कुंकु वाहून गेलेली वैजू काकुच दिसत होती.
आईने विचारल लवकर कसा काय आलास् रे ?  म्हणालो कुणीच् आले नाहीत म्हणून आलो निघून , आपण जत म्हणजे आजोळी जाउया . आई म्हणाली पप्पा ना दुपारी विचारुया आणि उदया निघुया , दुपारी कधीतरी तिला मी लवकर का आलो ते कळले म्हणजे वैजू काकु ने आत्महत्या केलेली आणि कुठे केली ते सुद्धा पण मी काही विषय काढत नाही म्हटल्यावर आईने सुद्धा मुद्दाम विषय काढला नाही ( तीला हे माहित नव्हते की मीच सगळ्यात आधी काकु ला पहिलेले , हल्ली हल्ली मी सांगितले)
नंतर जत ला गेलो आणि विसरलो पण पोहायला जायच धाडस होत नव्हतं , घरचे आलरेडी माझ्या पोहण्याच्या आवड़ीवर वैतागलेले ....बर झाल कमी झाल म्हणत असतील .
शाळेत सुद्धा मागच्या बाजूला एक मोठा हौद होता तिथे काहीजण पोहायचे पण मला पाण्यात फक्त वैजू काकु  दिसायची,विहिर ,नदी कुठेच् जाउ नये अस वाटायच....

4-5 वर्ष अशीच निघुन गेली आणि आम्ही निपाणी ला शिफ्ट झालो तिथे सगळी खणी मधे पोहायला जायची पण मी जात नव्हतो .एकदा माझा मोठा भाऊ गेला म्हणून त्याला आणायला गेलो तर तिथे एक छोटीशी मुलगी पोहायला शिकत होती , 6 -7 वर्षाची असेल , काठाला धरून पाय मारायचे प्रयत्न करत होती पण काही जमत नव्हते  , मी जवळ गेलो आणि पाय कसे मारायचे हे सांगू लागलो तर म्हणाली बाहेर उभ राहून सांगायला भारी वाटतं आत उतर मग कळेल , तुला पोहायला येत तरी का ? आयला मला चैलेंज, बरमूडा वरच होतो तसाच सूर मारला ,मुंडक डायरेक्ट दुसऱ्या टोकाला वर काढल , मला वाटल आश्चर्य करत असेल पण गोड हसत होती , सगळीच् मंडळी जोर जोरात हसायला लागली होती .
ती छोटी आमच्या नदाफ भैयांची पुतनी शबाना होती , कोल्हापूर ला राहते म्हणून मी ओळखत नव्हतो आणि सगळ्यानी मिळून माझा गेम केलेला मी पाण्यात उतरत नाही कारण मला पोहता येत नाही आणि मी पाण्याला घाबरतो असा गैरसमज झालेला पण भावाने पैज लावलेली की मला येते पोहायला...

काही का असेना पण मला वैजू काकुची असलेली भीती शबाना ने घालवली हे मात्र खर ,आता मला पाण्यात कायम शबानाचा इवलासा गोड चेहरा दिसतो....

बऱ्याच वेळा आपल्या बाबतीत , आजुबाजुला असे काही घडते की , उदाहरण द्यायचा असेल तर accident झाल्यावर पुन्हा गाडी चालवावीशी न वाटणे वैगेरे , मग आपल्यावर त्याचा एक पगडा बसतो ,भीती बसते आणि आपण पुढे जायला घाबरतो ,ट्राय करायच सोडा आपण सरळ रस्ता  नाकारतो पण तसे नसते. पुन्हा एखादी घटना किंवा व्यक्ति आपल्याला नविन दिशा देवून जावू शकतात म्हणून प्रयत्न करणे थांबवल नाही पाहिजे.

ता.क - शाळेमधे हौद्यात् पोहण्याचा काही जणांचा भन्नाट किस्सा आहे , पुन्हा कधीतरी तो.....

No comments: