12 ची exam देवून नुकताच घरी आलेलो . आमच्या घराच्या शेजारचा प्लॉट विकायला काढलेला , कुणीतरी अमिनाबी ने टोकन देवून बांधून घेतलेला , संध्याकाळी काका आले आणि म्हणाले चल , बाहेर येवून बघतोय तर निम्मी गल्ली तिथे हजर , झाडून सगळे बापे आणि माझ्याएवढी पोर आलेली मग त्या जागेच्या मालकाकड गेलो , बाप्यानी खुप धमकावला आणि विकायच नाही म्हणून सांगितल , त्याने टोकन चे पैसे खर्च सुद्धा केलेले मग काकानी ते पैसे दिले आणि सांगितले आम्ही घेतोय प्लॉट..
काकाना विचारायची सोय नव्हती , तेवढा तेव्हा दरारा असायचा , पोरानी जास्त लक्ष अभ्यासात घातल पाहिजे , म्हणून एका मित्राला विचारले का रे काय झाल ? तो म्हणाला अरे ती अमिनाबी धंदेवाली आहे . आपल्या गल्लीत कुठे आणतोस घाण ती ? तिच्याकड कोण कुठली लोक येणार. स्ट्रिक्ट हॉस्टल ला असलो तरी धंदेवाली म्हणजे वेश्या एवढं नक्कीच कळत होत. म्हटले बरोबर आहे.मधे कधीतरी अमिनाबी घरी येवून खुप विनवण्या करून गेलेली ,की तिने आता धंदा बंद केलाय , मुलगी कॉलेज ला आहे , आता चांगल्या ठिकाणी राहायचे आहे पण कुणी ऐकल नाही. तो प्लॉट मग आम्ही कसे बसे पैसे जमवाजमवी करुन घेतला.
इंजीनियरिंग ला होतो तेव्हा बेळगाव मधे रेल्वे स्टेशन च्या आसपास म्हणा किंवा कोल्हापुरात बसंत-बहार टॉकीज़ च्या आजुबाजूला दिसायच्या . सुरुवातीला त्यांच निरीक्षण करायला , उगाचच टिंगल करायला भारी वाटायच , टाइमपास म्हणून मित्राला गाडी मुद्दाम तिकडून न्यायला लावायचो . एकदा असेच जात होतो आणि जास्त वेळ रेंगाळलो तर एकिन विचारलच काय रे बस्तोस काय ? चड्डी पिवळी व्हायची बाकी आमची , गाडी ला किक मारतोय तर किक पण बसेना एवढे घाबरलेलो , तेवढ्यात म्हणाली काय दम नाही काय ? पुन्हा दिसलास तर बघ इथ...
माझा रूममेट रवी चा भाऊ किरण , बेळगाव लाच mbbs ला होता , रवी म्हणजे पुस्तकी कीडा आणि जाम फट्टू . किरणची आणि माझी खास जमायची , कॉलेज मधे दादागिरी मधे नाव खराब म्हणून पोरी ढुंकून सुद्धा बघत नव्हत्या , त्याच्या मागे लागायचो एक दोन पोरींशी ओळख करुन दे रे . माझ , माझ्या बाइक च कल्याण होवू दे , तश्या ही इंजीनियरिंग पेक्षा मेडिकल च्या पोरी भारी असतात दिसायला.एक दिवस म्हणाला उदया आम्ही एका ठिकाणी कैंप लावणार आहे , अख्खा क्लास असेल तू ये माझ्यासोबत आम्हाला मदतीला , काम काय कराव लागेल म्हणून विचारले , ते गटार बिटार मी काय साफ़ करणार नाही बघ . तो म्हणाला नाही रे फक्त मी सांगेन त्या गोळ्या , सांगेन त्या प्रमाणात एका पुड़ित बांधून दयायच्या . पूड़ी कशी बांधायची ते सुद्धा शिकवले.
मस्त तयार होवून दुसऱ्या दिवशी डॉट 8 ला मी कॉलेज वर हजर , खर तर कैंप साठी assembling 9 ची होती पण आम्ही अतिउत्साहाने लवकर हजर. ह्यांन मला मुद्दाम आधी सांगितल नव्हत, तिथे गेल्यावर कळल की कैंप होता बेळगाव च्या वेश्यावस्तीत , म्हटल ठीक आहे जाउया आपण .आपल्याला काय औषधाच्या आणि बाकीच्या सुद्धा पुड्याच् बांधायच्या आहेत.एका लेडीज डॉक्टर ( सुनैना) सोबत मला बसवला , मी खुश . जसे जसे पेशंट येत गेले तसे तसे माझ डोक उठत गेल , त्यांच्या जगण्याची , त्यातून घर , मूल संभाळण्याची धड़पड़ जानवायला लागली . एकीला 104 ताप होता , सुनैना सांगत होती आज तू फक्त आराम कर , नाहितर खुप वीकनेस येईल एडमिट कराव लागेल,ती म्हणाली बाई पोरग शिकायला बाहेर ठेवलय खर्च खुप आहे, थंडी पडल्या , सीजन चालू आहे , आता महिनाभर आराम करून नाही चालणार.
एकीच्या डोक्याला खोक पडलेली , गिरहाइक् अचानक violent झाल आणि भिंतीवर हीच डोक आपटल , 2 तास बेशुद्ध होती ,तिची सासु एडमिट होती दवाखाण्यात , नवरा दारुडा होता , धंदा करण्यावाचून पर्याय नव्हता
एकीला तिच्या नवरयान स्वतःच्या नोकरी साठी मालकाच्या सोबत लावल आणि मग मालकान त्याच्या मित्रांसोबत अशी पूर्ण साखळी सुरु झाली आणि ती हया व्यवसायात आली.
कुणी स्वेच्छेने , तर कुणी जबरदस्तीने ओढवलेल्या परिस्थितिने उतरलेले
गेलो होतो टाइमपास करायला पण माझ्या डोक्याचा टाइमपास झालेला , परिस्थिति बघुन डोक भनभणायला लागल आणि निम्यातून रूम वर आलो.
रवि न विचारले काय झाल ? जेवणार काय ? पूर्ण भूक मेलेली , जोरात रडावस वाटत होत.
बापाच्या जिवावर पेट्रोल , सिगरेट च्या धुराचा माज काढणारे आम्ही ,त्यांनी परिस्थिति पुढे पत्करलेली शरणागती आणि त्यातून स्विकारलेली लाचारी स्वस्थ झोप सुद्धा लागू देईना . जोरजोरात रडायला लागलो .रवि ने घाबरुन किरण ला फ़ोन करून सांगितले आणि किरण मग त्याच्या मैत्रिणींसोबत आला , त्यांना अमिनाबी बद्दल आणि आम्ही केलेल्या दादागिरी बद्दल बोललो. ते तिघे चौघे जन समजावून सांगत होते अरे त्यांच्यावर आपण आणलीये का अशी वेळ ? आपण त्यांच्या परिस्थिति वर काही करू शकत नाही म्हणून आम्ही मेडिकल कैंप घेतो जेने करुन वेळेवर उपचार मिळतील.समाजामधे अधे अनेक घटक मिळतील , त्यांच्यासाठी कधी काय करता आल तर नक्की बघ , आता उठ ,चल जेवायला...
नंतर कित्येक वेळा मुंबईतून रात्री अपरात्री घरी जात असताना , कोल्हापूर CBS ला दिसायच्या पण आता टिंगल पेक्षा एक वेगळा आदरार्थी भाव आलेला . एकदा रात्री12च्या आसपास तिथून जात असताना दोन 15,16 वयाच्या पोरी उभ्या होत्या , त्यांना 200 रुपये देत म्हणालो बायानो जेवून घ्या ,त्या सरळ अंगावर आल्या , आम्ही काय भिकारी वाटलो काय रे xxxxx तुला ?
बारबाला पुस्तक वाचत होतो , ते निम्म्यात् सोडल कारण पुढे वाचू वाटेना .समाजच , समाजाने घेतल्या फायद्याच् एवढं भयानक चित्र खर असल तरी ते झेपेना , अंगावर धावून येवू लागल..
वेश्या व्यव्साय असावा की नसावा ह्यामधे नाही पडायच मला , पण परिस्थिति मुळे कुणाला ह्यामधे पडायला लागू नये अस मात्र वाटतं। ते हाल , ती लाचारी नाही पाहवत , पुढच्या पिढ्या पुन्हा ह्यामधे येवू नयेत म्हणून चालणाऱी धड़पड़ प्रशंसनीय वाटते खरी पण कुठेतरी आपल्या समाजाने त्यांना हे करायला भाग पाडलय हे जाम टोचत....
आजही किरण , सुनैना अधे मधे फ़ोन करतात तेव्हा मी जास्त शहाणपणा करायला लागलो की कैंप ला नेण्याची भीती घालतात...
अमिनाबीला नंतर कुणी घर , जागा आमच्या एरिया मधे कुणीच् नाही विकली , शेवट पर्यंत भाड्याच्या घरातच राहिली बिचारी, तिला एकदा सॉरी म्हणून माफ़ी मागायची होती की मी तुला समजायला चूक केली, तुला एक हक्काचा निवारा ,तुझ्याच पैशाने तुला घेवू दिला नाही , चुकलो मी पण ते राहिलच.....
आजही रात्री , अपरात्री कुठे कुठल्या बस स्टॉप वर कुणी दिसल की समोर अमिनाबी आणि तिच्यासोबत मनामधे तो गिल्ट उभा राहतो..
No comments:
Post a Comment